- हॉटेलमधील वेटर, कॅप्टन विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२१) :- पिंपळे निलख येथील वाघजाई हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या दोन ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याआधारे त्यांची ५३ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
वाघजाई हॉटेलमधील वेटर, कॅप्टन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दयानंद प्रकाश किरोळकर (वय ३०, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किरोळकर ७ जानेवारी रोजी पिंपळे निलख येथील वाघजाई हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी बिल भरण्यासाठी एटीएम कार्ड वेटरकडे दिले. वेटरने एटीएम कार्डचा डेटा क्लोन केला. तसेच पिन नंबरची चोरी केली. त्या माहितीच्या आधारे दुसरे एटीएम कार्ड तयार केले व किरोळकर यांच्या बँक खात्यातून ३८ हजार रुपये काढून घेतले. असाच प्रकार आकाश खोकर यांच्यासोबत देखील झाला. त्यांच्या बँक खात्यातून १५ हजार ९०० रुपये काढून घेण्यात आले. दोन्ही मिळून एकूण ५३,९०० रुपये वेटरने काढून घेतले.


















