- शिक्षण संस्थेत अफरातफर व फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव गौरव कदम आहेत. कदम आणि शिक्षक संघटना पदाधिकारी संभाजी शिरसाट यांनी सुबोध विद्यालयाच्या नावाने लिपीक व शिपाई या दोन पदासाठी बनावट कागपत्रे तयार केली. बनावट वैयक्तिक मान्यता तयार करुन त्या खोट्या असुनही ख-या असल्याचे शासनाला भासवले. त्याद्वारे आरोपींनी जून ते सप्टेंबर २०१६ या कालावधीची वेतन देयक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वेतन देयक पथकाकडे पाठवून दिली. त्यानंतर वेतनापोटी एक लाख ४६ हजार ६०३ रूपये इतके पैसे घेऊन शासनाची फसवणूक केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत जिल्हा परिषदे प्राथमिक विभागतील भविष्य निर्वाह निधी विभागाचे अधिक्षक राजेंद्र साठे (वय ४६, रा. शनिवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संस्था सचिव गौरव अशोक कदम, संभाजी सुभाष शिरसाट, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचा तत्कालीन वेतन पथक अधिक्षक यांच्या विरुद्ध फसवणुक, बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संभाजी शिरसाट याला शुक्रवारी रात्री अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडुन केला जात आहे.
यातील गुन्हा दाखल झालेले संस्था सचिव गौरव अशोक कदम हे राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका तथा माजी महापौर मंगला कदम यांचे चिरंजीव आहेत.