- पोलीस आयुक्तांची धडाडीची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जानेवारी. २०२१) :- वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या तीन लॉजवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. लॉजमधील पाच खोल्या सील केल्या आहेत. तीन महिन्यांसाठी त्या खोल्या बंद राहणार आहेत. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरातील साईराज लोंजिंग धावडेवस्ती, सन लॉज अँड मुझिक अँड डिस्को लाईट हॉल (सूर्या हॉटेल अँड लॉज) शास्त्री चौक, तसेच हॉटेल वनराज डिल्क्स फॅमिली रेस्टॉरन्ट अँड बार लॉजिंग, शास्त्री चौक या तीन लॉजवर ही कारवाई करण्यात आली.
या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी छापा टाकण्यात आला होता. त्या कारवाईत आठ आरोपींना अटक करून पीडित नऊ महिलांची सुटका करण्यात आली. वेश्याव्यवसायप्रकरणी संबंधित लॉज सील करण्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांनी प्रस्ताव तयार केला. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.