- सर्वसामान्य नागरिकांसाठी उभारणार वनरूम किचनची घरे..
- अनधिकृत घरांचा डोंगर उभारल्यावर अंतिम क्षणी झाली प्राधिकरणाला उपरती..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जानेवारी. २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनडीटी) लवकरच सामान्य नागरिकांना परवडतील अशी वनरूम किचनची घरे साकारणार आहे. या वर्षात ६ हजार ३०९ नवीन घरांची उभारणी करण्यात येणार असून, त्यात लहान आणि मध्यम आकाराच्या नवीन श्रेणीतील सदनिका असतील.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची ३४८ वी सभा झाली. त्यात प्राधिकरणाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्राधिकरणाच्यावतीने टेल्को कंपनीमागील फेज १ अंतर्गत ४ हजार ८८३ सदनिकांचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्याचे साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. चालू वर्षात फेज -२ अंतर्गत नवीन ६ हजार ३०९ सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात येईल. त्यात १३२ व्यापारी गाळेदेखील असतील. याशिवाय सदनिकांमध्ये लहान आणि मध्यम आकारांच्या दोन नव्या श्रेणी असतील. लवकरच या प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातील ४२ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या ४ कामासाठी १.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.