- विभाजनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत – गिरीश बक्षी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जानेवारी. २०२१) :- पुण्यातील सर्वाधिक विद्युत अपघात झालेल्या शाखेपैकी एक असलेल्या महावितरणच्या मोशी शाखेच्या विभाजन प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या शाखेअंतर्गत ८५ हजारापेक्षा अधिक जास्त वीज ग्राहक आहेत. परिणामी, येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून, वीजबिल दुरुस्ती, नवीन जोडण्या, दोष दुरुस्ती याबाबत सेवा पुरविणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे चांगली सेवा देण्याच्या हेतूने या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
मोशी शाखेव्यातिरिक्त पुणे जिल्ह्यातील अशाच अन्य दोन शाखांचे विभाजन करण्यास महावितरण प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मोशी शाखेच्या कामकाजाबाबत वेगवेगळ्या तक्रारी आहेत. या शाखा कार्यक्षेत्रात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक प्राणांतिक विद्युत अपघात घडले आहेत. एका अपघाताची मानवी हक्क आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे हितसंबंध निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
याबाबत पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्षी यांनी सांगितले की, मोशीतील वीज ग्राहकांची संख्या अनेकपटींनी वाढली आहे. या शाखेतील ठराविक कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीबाबत संघटना व वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. विभाजनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत.