- प्रभाग १३ मधील नगरसेवकांच्या मागणीला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जानेवारी. २०२१) :- निगडी येथील भक्ती – शक्ती समुह शिल्प उद्यान चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर व वर्तुळाकार मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पास जगद्गगुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती – शक्ती) असे नाव देण्याचा ठराव ‘ फ’ क्षेत्रीय समितीने केला होता. त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी त्या नावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.
या प्रकल्पाचे काम गेल्या ३ वर्षांपासून सुरू आहे. या जानेवारी अखेरपर्यंत ते काम पूर्ण होऊन सर्व बाजूचे रस्ते वाहतुकीस खुले केले जातील, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यानंतर त्यांचे उद्घाटन केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे या चौकातील वाहतुक सिग्नल फ्री होऊन अधिक सुरक्षित होणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकल्पास ‘ भक्ती – शक्ती ‘ असे नाव द्यावे असा ठराव ‘ फ ‘ क्षेत्रीय समितीने ४ जून २०१८ ला केला होता. नगरसेवक सचिन चिखले, प्रा. उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप हे या ठरावासाठी सूचक व अनुमोदक होते. तब्बल अडीच वर्षानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव अडीच वर्षांनंतर पालिका सभेसमोर ठेवण्यात आला. सभेत महापौर उषा ढोरे यांनी भक्ती – शक्ती नावाला मंजूरी दिली आहे.


















