- केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे – अनुप मोरे..
- प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व मान्यवरांचीही उपस्थिती…
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार ‘ आत्मनिर्भर भारत ‘ अभियानाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उद्घाटन सोहळा उद्या शनिवार (दि. २२) रोजी सायं. ५.०० वाजता निगडीतील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न होणार असून, यास भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस सुशिल मेंगडे, प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे व भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.
‘आत्मनिर्भर भारत’ च्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण होणार आहे. भाजयुमोकडून युवा तसेच जनसामान्यांपर्यंत विविध योजना पोहोचाव्यात, तसेच या अभियानाद्वारे फुटपाथवरील दुकानदार, कामगार, शेतकरी, मध्यमवर्ग, मध्यम व लघु उद्योजक यांनाही त्याचा फायदा व्हावा, यासाठी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत व नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ मार्गदर्शन केंद्राचे शहरात उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून, भाजप सरकारच्या विविध योजनांची जनतेमध्ये जागृती करावी, असे आवाहन भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी केले आहे.


















