- भोसरीतील घटना; आरोपींना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जानेवारी २०२१) :- वडापाव देण्यास नकार दिल्याने चौघांनी टपरी चालकासह त्याच्या मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २०) रात्री बालाजीनगर, भोसरी येथे घडली. प्रशांत लांडगे, इश्वर राजू पवार (वय ३२), शेखर राजू पवार (वय २६), रोहित मुकुंदराव पवार (१९, सर्व रा. गणेशनगर, टेल्को रोड, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी शेटीबा नागप्पा चौगुले (५०, रा. टेल्को रोड, बालाजीनगर, भोसरी) यांनी गुरुवारी (दि. २१) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेखर, रोहित आणि ईश्वर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी शेटीबा हे टपरी बंद करीत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना वडापाव मागितला. मात्र, टपरी बंद करीत असल्याचे सांगून शेटी यांनी वडापाव देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांना लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत फिर्यादी आणि त्यांचा मुलगा गणेश हे आरोपिंच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
















