- लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडून मिळाला ” स्टार २०२०” बहुमान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- मोशी येथील सिल्वर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर व महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष उद्योजक संतोष बारणे यांनी करोना कालावधीत गरजू नागरिकांची दिलेल्या सेवा कामाची दखल घेऊन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यांच्याकडून “ स्टार २०२० ” हा बहुमान देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २० मार्चपासून देशात व राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. अशा गंभीर परिस्थितीमध्ये सर्व काम धंदा ठप्प झाला होता. अनेक कुटुंबावर आर्थिक व दैनंदिन संकट ओढवले होते. याची तीव्रता लक्षात घेऊन मोशीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोष सिताराम बारणे यांनी पिंपरी चिंचवड व आदिवासी परिसरातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. यामध्ये मोफत अन्नदान व आरोग्य तपासण्यांचे आयोजन केले.
आदिवासी व ग्रामीण भागात लॉकडाऊन कालावधीत अॅम्बुलन्सच्या माध्यमातून ” डॉक्टर आपल्या दारी ” हा सामाजिक उपक्रम राबविला. यामार्फत अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी व कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरजू नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविली. संतोष सिताराम बारणे मेडिकल व सोशल फाउंडेशन मोशी, पुणे यांच्यामार्फत संतोष बारणे यांनी डॉक्टरांचे एक पथक तयार करून गावोगावी अॅम्बुलन्सने नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचविली. या अॅम्बुलन्समध्ये ऑक्सिजन पुरवठा कीट, ऑपरेशन साहित्य , कार्डिओलॉजी व करोना तपासणीसाठीचे प्राथमिक साहित्यामध्ये इन्फरेड थर्मामीटर, हॅन्ड ग्लोज, फेसशील्ड, सेनीटायझर, मास्क अशी साहित्यसेवा पुरवली. त्याचबरोबर राज्यात रक्तदान तुटवडा निर्माण झाल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन केले. अशा विविध सामाजिक कार्याची दखल घेत लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी “ स्टार २०२० ” चा बहुमान बारणे यांना दिला आहे.


















