- आ. दिलीप मोहिते पाटलांकडून प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- खेड व चाकण येथील औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी खेड तालुक्यात विमानतळ व्हावे, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल केला असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मोहिते म्हणाले, पुर्वी नियोजित असलेला खेड तालुक्यातील विमानतळ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने रद्द झाला. पुरंदर तालुक्यात हे विमानतळ होणार आहे. पुरंदर तालुक्यात मोठे आंदोलन होऊन विमानतळाला तीव्र विरोध झाला. आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे. बर्फाळ प्रदेशात देखील विमानतळ होत आहेत. तांत्रिक अडचणीचे कारण बाजुला करून हा प्रकल्प पुन्हा खेड तालुक्याच्या पुर्व भागात नव्याने सुरु व्हावा, अशी खेड तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
तालुक्यात विमानतळाला पुर्वी होणारा विरोध मावळला आहे. विमानतळ झाले तर खेड तालुक्याचा कायापालट होणार आहे. तालुक्यात असणाऱ्या मोठ्या कंपन्या तसेच तालुक्यातून गेलेल्या पुणे – नाशिक मार्ग आणि पुणे – मुंबई तसेच चाकण, तळेगाव, मुंबई मार्ग जवळ असल्यामुळे मालाची वेगवान वाहतूक पुरंदर तालुक्याच्या तुलनेत वेगाने करणे शक्य आहे. यामुळे विमानतळ खेडला व्हावे, अशी अपेक्षा मोहिते यांनी व्यक्त केली.












