- दारू, गुटखा, सिगारेटसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- विनापरवाना विक्री होत असलेली दारू, सिगारेट तसेच गुटखा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. चिखली व हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत एकूण नऊ लाख ३५ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायमंड – पान स्टोअर व भास्कर चौधरी यांच्या कुदळवाडी येथील पत्र्याच्या गोडावूनमधून तंबाखूजन्य गुटखा साठा करून ठेवला असून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारून २३ हजार ६३० रुपयांची रोकड, पाच लाख ५४ हजार ३६३ रुपयांचा गुटखा, २५२० रुपयांचे सिगारेट, ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल, ५५ हजारांची दुचाकी असा एकूण सहा लाख ६५ हजार ५१३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच पुनाराम वोराराम सिरवी (वय २२, रा. शाहूनगर, चिखली) याच्यासह अन्य एका जणाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच हिंजवडी फेज ३ येथे भोईरवाडी परिसरात विनापरवाना दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन, आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, ११ हजार ५३२ रुपये किमतीच्या विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या, असा एकूण दोन लाख ६९ हजार ५३२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला.












