- गरवारे कामगार कृती समितीची राज्याच्या कामगार मंत्र्यांकडे धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- कंपनीतील विविध प्रश्नांवर लक्ष घालण्यासाठी गरवारे नायलॉन कामगार कृती समितीने राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची पुण्यात भेट घेतली. लवकर या प्रश्नांवर लक्ष घालून शासनाच्या वतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी समितीला दिली.
यावेळी समितीचे अध्यक्ष गजानन गवळी, दत्तात्रय खैरे, रमेश बोंद्रे उपस्थित होते. गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांची सर्व देणी, पीएफ, ग्रॅच्युइटी व इतर रक्कम त्वरीत देण्याबाबत तसेच, कंपनीच्या खरेदी विक्री गैर व्यवहाराबद्दल स्थगिती देवून जागेच्या व्यवहाराबद्दल योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
१९ एकरचा लिलाव फक्त १६ कोटी ४० लाखात कसा झाला, अस्तित्वातील इमारत पाडून मुल्यांकन शून्य कसे झाले, कंपनीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाची मालमत्ता ताब्यात का घेतली नाही, कामगारांची सर्व देणी दिल्याशिवाय जागा विकसनाचा प्रयत्न कसा होतो, या बाबी मंत्री वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या.












