- १८ मीटर व त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची साफसफाई यांत्रिकी पद्धतीने होणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईसाठी दुसऱ्यांदा मसुदा तयार केला आहे. १८ मीटर व त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची साफसफाई यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. रस्त्यांची चार भागांमध्ये विभागणी केली आहे. सात वर्षे कालावधीसाठी अंदाजे ४६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज करण्यात येते. निविदा प्रक्रियेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी. व्ही. जी. इंडिया या दोन संस्थांना १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१७ या दोन वर्षे कालावधीसाठी कामकाज सोपविले होते. हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या संस्थांना मुदतवाढ दिली होती.
शहरातील मंडई, रस्ते आणि इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईच्या कामासाठी आरएफपी तयार करण्यासाठी टंडन अर्बन सोल्युशन्सची नियुक्तीस मान्यता दिली. त्यानुसार शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची साफसफाई ही यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी मसुदा ७ जानेवारी २०२१ रोजी सादर करण्यात आला आहे. या अनुषंगाने १९ जानेवारी रोजी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समक्ष सादरीकरण केले. रस्त्यांची चार भागांमध्ये विभागणी केली आहे. त्यामध्ये महापालिका मुख्यालयाच्या दक्षिण बाजूसाठी दोन पॅकेज आणि उत्तर बाजूसाठी दोन पॅकेज निश्चित केले आहे. पॅकेज एकसाठी २२१.६८ किलोमीटर, पॅकेज दोनसाठी २३६.२ किलोमीटर, पॅकेज तीनसाठी २३९.८६ किलोमीटर आणि पॅकेज चारसाठी २३०.६९ किलोमीटर इतकी रस्त्याची लांबी निश्चित केली आहे.