NEWS PCMC NETWORK : चेन्नई : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून चेन्नईत त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्रतिक रोशनसह अन्य आठ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. मुरलीधरन नावाच्या एका व्यक्तीने हा गुन्हा दाखल केला आहे. एका कंपनीने आपली ह्रतिक रोशनचा ब्रँड एच.आर.एक्स. (HRX) विक्रेता म्हणून नियुक्ती केली होती. परंतु ह्रतिक रोशन आणि इतर लोकांनी फसवणूक केल्याने 21 लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप मुरलीधरनने केला आहे.
तक्रारीनुसार, ह्रतिक रोशनने ब्रँड एच.आर.एक्स. (HRX) हा ब्रँड 2014 मध्ये लॉन्च केला होता. त्यानंतर एका कंपनीने मुरलीधरन यांना या ब्रँडचा विक्रेता म्हणून नियुक्त केले होते. परंतु अभिनेत्याच्या कंपनीने नियमीत स्वरूपाल ब्रँडचा माल पाठवला नाही आणि कोणतेही कारण न देता मार्केटिंग टीमला बरखास्त केले. याचा परिणाम म्हणून अनेक प्रोडक्टची विक्री झाली नाही. त्यामुळे उरलेले प्रोडक्ट कंपनीला परत करण्याचा विचार केला तेव्हा ह्रतिक रोशनने याबदल्याल पैसे देण्यास नकार दिला, असा आरोप मुरलीधरन यांनी केला आहे. या प्रकरणी ह्रतिक रोशनला नोटीसही पाठवण्यात आली आहे.
नोटीसला उत्तर देताना अभिनेत्याकडून असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, या ब्रँडचे काही उत्पादन दिल्ली आणि मुंबईच्या काही कंपन्यांना देण्यात आले होते आणि ते मुरलीधरनला झालेल्या नुकसानीस जबाबदार नाही. दरम्यान, मुरलीधरनने या प्रकरणी 2014 मध्ये प्रथम पोलिसात तक्रार दाखल केली होती, परंतु आता चार वर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी अभिनेता ह्रतिक रोशनवर कलम 420 (फसवणूक) गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.












