न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणीनगर , भोसरी येथील भाजी मंडईतील ९० गाळ्यांचे वितरण सोडत पद्धतीने बुधवारी (दि. २७) करण्यात आले. त्यासाठी विक्रेत्यांकडून ५ हजार रुपयांसह अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यांच्याकडून १ वर्षाचे भाडे आगाऊ घेतले जाणार आहे.
पालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात ही सोडत काढण्यात आली. या वेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक विलास मडिगेरी, नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहायक आयुक्त नीलेश देशमुख, अधिकारी कोळप आदी उपस्थित होते.
मंडईत एकूण ७२ ओटे व १८ फरशीवरील आहेत. पन्नास विक्रेत्यांकडून ५ हजार रूपयांसह अर्ज भरून घेऊन त्यांना ५० गाळ्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर एकूण १२ गाळ्याचे वितरण निव्वळ अर्ज भरणाऱ्यांना देण्यात आले. उर्वरित २८ गाळ्यांचे आज सोडत पद्धतीने वितरण करण्यात आले. त्यांच्याकडून ५ हजार रुपये व एका वर्षाचे एकत्रित भाडे आगाऊ घेऊन ५ वर्षांसाठी करारनामा करण्यात येणार आहे.














