- भ्रष्टाचार, संगनमत करून निविदा भरल्या जातात; आयुक्तांचे सोयीस्कर दुर्लक्ष – खा. बारणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- मागील साडेचार वर्षापासून आयुक्त श्रावण हर्डीकर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यांच्या काळात चुकीची कामे सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची ठेकेदारांसोबत भागीदारी आहे. भ्रष्टाचार बोकळला असून त्याला प्रशासनाचा पाठिंबा आहे. चुकीच्या कामाला आयुक्त जबाबदार असून, त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी केली जावी, असा हल्लाबोल शिवसेनेचे खा. श्रीरंग बारण यांनी बुधवारी (दि. २०) रोजी पत्रकार परिषदेत केला.
खा. बारणे म्हणाले की, आयुक्तांच्या नियोजनशून्य कारभारामुळे करदात्या नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. हर्डीकर यांच्या कारकिर्दीत झालेल्या चुकीच्या सर्व कामांची चौकशी केली जावी. एफडीआर व बँक गॅरंटीच्या बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची प्रशासनाला पूर्वीपासून माहिती होती. डिसेंबर २०२० मध्ये हे प्रकरण लक्षात आले. अठरापैकी केवळ ५ दोषी ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. प्रशासन त्यात गुंतले असून दोषी आहे. त्यामुळे छोटे मासे गळाला लावले जात आहेत. या प्रकरणाला आयुक्तांनी बगल दिली. आयुक्त शहरातून जाण्याची वाट बघत आहेत. त्यांच्या चुकीच्या ८ कामाचा परिणाम शहरवासीयांना भोगावा लागणार आहे.
रस्ते मोठे करण्याऐवजी सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च करून मोठे पदपथ विकसित केले जात आहेत. त्यावर अनधिकृत व्यवसाय केले जात आहेत. त्याला प्रशासनाकडून पाठिंबा दिला जात आहे. निविदेत रिंग केले जाते. भ्रष्टाचार, संगनमत करून निविदा भरल्या जातात. या सर्व गोष्टी आयुक्तांना माहिती आहेत. पण त्याकडे हेतुपुरस्सर ते दुर्लक्ष करतात, असा आरोप बारणे यांनी केला.
भामा – आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाची जलवाहिनी ५ किलोमीटर अंतर खासगी जागेतून, ७ किलोमीटर वन खाते, उर्वरित एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतून जात आहे. पालिकेने कोणत्याही जागेचे भूसंपादन केले नाही. ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा काढली आहे. भामा – आसखेडच्या कामाला २०१४ मध्ये परवानगी देण्यात आली. परंतु, प्रशासनाला काम हाती घेता आले नाही. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा परवानगी दिली. मात्र आजपर्यंत भूसंपादनाची कार्यवाही प्रशासनाला करता आली नाही. या प्रकल्पाचीही भविष्यात पवना बंद जलवाहिनी प्रकल्पासारखी अवस्था होण्याची भीतीही खा. बारणे यांनी व्यक्त केली.














