महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकत कर थकविल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्यावरून महापालिकेच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शनिवारी वेगाने घडामोडी घडल्या आणि संबंधित नोटिशीला मंगळवारपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
गिरीश प्रभुणे यांची चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती ही संस्था आहे. तसेच क्रांतिवीर चापेकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय त्याचप्रमाणे समरसता पुनरुत्थान गुरुकुलम शाळा देखील आहे. त्यात क्रांतिवीर चापेकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचा एक कोटी २१ लाख सात हजार ३४० रुपये मिळकत कर थकीत आहे.
तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या मिळकतीतील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम शाळेच्या अनधिकृत इमारतीच्या मिळकत करापोटी एक कोटी ७७ लाख ५ ९ हजार १४२ रुपये थकबाकी आहे. दोन्ही मिळकतींच्या करापोटी दोन कोटी ९८ लाख ६६ हजार ४८२ रुपये थकबाकी आहे. याबाबत महापालिकेकडून प्रभुणे यांच्या संस्थेला १३ जानेवारी २०२१ रोजी नोटीस बजावण्यात आली होती.


















