- पोलीस कर्मचारी गंभीर जखमी..
- राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देणार रुग्णालयास भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- वाहतूक नियमन करणाऱ्या चाकण वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना पुणे – नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकात शनिवारी (दि. ३०) दुपारी घडली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत मुंबईला पळून जाणाऱ्या दोघांना खराबवाडी येथून अटक केली आहे.
रोहित बाबू साळवी (२०, रा. सम्राट अशोक बिल्डिंगजवळ, रेल्वे स्टेशनसमोर, कल्याण, ठाणे) व हर्षदीप भारत कांबळे (२२, रा. नांदिवली इस्ट कल्याण, ठाणे) अशी आरोपींची नावे असून, या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र नामदेव करवंदे (३०, नेमणूक – चाकण वाहतूक शाखा, पिंपरी – चिंचवड) जखमी झाले आहेत.
याबाबत वाहतूक शाखेच्या उपनिरीक्षक नम्रता डावरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस कॉन्स्टेबल करवंदे शनिवारी दुपारी तळेगाव चौकात वाहतूक नियमन करीत असताना अनोळखी दोन व्यक्ती स्प्लेंडर दुचाकी (एमएच १४ एफझेड १३४५) वरून तेथे येत करवंदे यांच्यावर हल्ला केला आणि दुचाकीवरून तळेगाव रोडने पळून गेले. पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय गुन्हे शाखा, युनिट तीनच्या पथकाने चाकण तळेगाव चौक ते महाळुगेदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन्ही हल्लेखोरांना खराबवाडी (ता. खेड) येथून शिताफीने ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेची माहिती घेण्यासाठी मॅक्स न्यूरो हॉस्पिटल, कासारवाडी येथे आज सोमवारी (१ फेब्रुवारी २०२१) रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भेट देणार आहेत.


















