- सरकारचे, प्रशासनाचे पोलीस व्यवस्थेकडे लक्ष नाही – प्रवीण दरेकर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२१) :- जे पोलीस आपली काळजी घेतात, त्यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. पोलिसांवरील हल्ले लज्जास्पद बाब असून, ही शोभा देणारी गोष्ट नाही. यापुढे पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलीस शिपाई रवींद्र करवंदे हे वाहतूक चौकशी नियमन करीत असताना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात करवंदे गंभीर जखमी झाले. त्यामुळे करवंदे यांची दरेकर यांनी सोमवारी कासारवाडी येथे खासगी रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, जखमी पोलीस करवंदे यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहेत. असा एक दिवस नाही की राज्यात पोलिसांवर हल्ला झाला नाही. पोलिसांच्याच सुरक्षेची चिंता असेल तर त्यांची सुरक्षा करा, अशी कोणाकडे मागणी करायची? ही सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने व्यवस्थेवर नीट लक्ष ठेवत समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांची पुन्हा अशी हिम्मत होणार नाही, यासाठी ही प्रवृत्ती मुळासकट ठेचली पाहिजे. पूर्वी पोलीस एक दंडुका घेऊन आले तरी गाव शांत व्हायचं. आज ते कमी होताना दिसतंय, सरकारचे, प्रशासनाचे, व्यवस्थेकडे लक्ष नाही. त्यांनी लक्ष द्यावे.


















