- विवाहितेकडून मानसिक छळाचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२१) :- फिनेल प्राशन करून विवाहितेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. घरकुल, चिखली येथे सोमवारी (दि. १) सकाळी ही घटना घडली. त्यानंतर तिला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आलेल्या तिच्या नातेवाइकांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.
रूपालीआकाश पाचंगे (वय २०, रा. वाडेबोल्हाई, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहितेचे नाव आहे. रूपाली यांचे माहेरचे लोक घरकुल, चिखली येथे वास्तव्यास आहेत. रूपाली या रविवारी माहेरी आल्या. सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होत असल्याचे त्यांनी त्यांच्या आईला सांगितले.
दरम्यान सोमवारी सकाळी रूपाली यांनी फिनेल पिऊन राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्या हातगाडीवर पडून जखमी झाल्या. त्यांना महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेबाबत माहिती मिळताच रूपाली यांचे नातेवाईक वायसीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की होऊन गोंधळ निर्माण झाला. यात काही वाहनांचे किरकोळ नुकसानही झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.