- पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील घरफोड्यांचा होणार उलगडा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- दरोड्याच्या तयारीच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली. घरफोडीचे १२ तर वाहनचोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ३० लाख ६०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, तीन टीव्ही, पाच व चार चाकी वाहने, चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी वेळोवेळी अटक करूनही आरोपी जामिनावर सुटून पुन्हा घरफोडी व इतर गुन्हे करीत असल्याचे तपासातून समोर आले समोर आले आहे.
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३२), जितसिंग राजपालसिंग टाक (वय २६, दोघे रा. हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या सख्ख्या भावांचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरजितसिंग व जितसिंग हे दोन्ही इंद्रायणीनगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडले. २३ जानेवारी रोजी त्यांना अटक केली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, ते टोळीने गुन्हे करतात. गुन्हे करण्यासाठी ते चोरीच्या वाहनांचा वापर करीत होते. चारचाकी वाहन चोरून ते १० ते २० किलोमीटरवर एका ठिकाणी पार्क करीत. त्यानंतर चोरीच्या दुचाकीने त्याठिकाणी जाऊन चोरीच्या चारचाकी वाहनातून घरफोडी किंवा गुन्हे करण्यासाठी जात. घरफोडी करून झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी चारचाकी पार्क करून तेथील दुचाकीने चोरीचा मुद्देमाल घेऊन निघून जात. आरोपी सुरजितसिंग आणि जितसिंग यांच्यावर दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी व वाहनचोरी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सुरजितसिंग याच्यावर पिपरी, येरवडा, हडपसर, कोथरुड, खडकी, एमआयडीसी भोसरी, लोणीकंद, दत्तवाडी, सांगवी, डेक्कन, फरासखाना व चिखली या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. जितसिंग याच्यावर कोथरुड, सिंहगड, हडपसर, डेक्कन, मुंढवा, दत्तवाडी, वानवडी, वारजे माळवाडी, भोसरी पोलीस ठाण्यात एकूण २३ गुन्हे दाखल आहेत.















