- आणखी दोषी ११ ठेकेदारांवर कारवाईची प्रतीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेस बँक गॅरंटी व एफडीआरची बोगस प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल आणखी दोन दोषी ठेकेदारांबाबत पालिकेने पिंपरी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. ३) कलम ४२० नुसार फसवणुकीची तक्रार दिली आहे. मात्र, अद्यापि ११ दोषी ठेकेदारांवर कारवाईची प्रतीक्षा कायम आहे.
बी. के. कन्स्ट्रक्शन अॅण्ड इंजिनिअरिंग (परमेश्वर हणमंत क्याटनकरी) आणि राधिका कन्स्ट्रक्शन (अटल बुधवाणी) हे त्या दोन दोषी ठेकेदारांची नावे आहेत. या पूर्वी ५ दोषी ठेकेदारांबाबत पालिकेने तक्रार दिली होती. त्यांच्यावर पोलिसांनी फौजदारी गुन्हा नोंदविला आहे. एकूण १८ दोषी ठेकेदारांपैकी केवळ ७ ठेकेदारांबाबत पालिकेने अद्यापर्यंत पोलिसांत तक्रार दिली आहे, असे स्थापत्य विभागाचे लेखापाल रमेशकुमार जोशी यांनी गुरुवारी (दि. ४) सांगितले.
आयुक्तांनी आदेश दिल्याने तक्रार नोंदविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उर्वरित ११ ठेकेदारांची अद्यापि तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना पालिका प्रशासनाने अभय दिले आहे का, असा सवाल पालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.














