- नगरसेवक सचिन चिखले यांची प्राधिकरणाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने यमुनानगर भागांतील सर्व विकसित इमारती व भूखंड यांना कन्व्हेअन्स डीड (मालकी हस्तांतरण) करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक सचिन चिखले यांनी केली आहे. चिखले यांच्यासह एच. ए. पाटील, ए. आर. निकम आदी स्थानिक नागरिकांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांना याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्राधिकरणाच्या नियोजित आराखड्यामध्ये निवासी व रहिवासी वापरासाठी राज्य सरकारने ‘ डी ‘ प्लॅन मंजूर केलेला आहे. गृह योजनेला राज्य शासनाची मान्यता आहे. तसेच, या गृहयोजनेतील कामगारांना वर्षांच्या भाडेपट्ट्याने सदनिका दिलेली आहे. भाडेपट्ट्यामध्ये लीज डीडनुसार ९९ वर्षासाठी दरवर्षी एक रुपया भूसंपादन भाडे आणि महसूल कर वसूल केलेला आहे. मात्र, नागरिकांना पूर्ण मालकी हक्क दिलेला नाही.
सर्व मालकी हक्क हा प्राधिकरणाकडे आहे. राज्य शासनाने संपूर्ण जमीन मंजूर विकास आराखड्यामध्ये निवासी म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे या प्रकाराचा नागरिकांशी काहीही संबंध येत नाही. नवीन नियमानुसार प्राधिकरणाचा विकसित केलेला भाग महापालिकेत वर्ग केलेला आहे. शासन दरबारी तसा नियम केलेला आहे. प्राधिकरणाच्या यमुनानगर भागातील सर्व विकसित झालेल्या इमारती व भूखंड यांना कन्व्हेअन्स डीड (मालकी हस्तांतरण) करण्यात यावे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.














