- विरोधी पक्षांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- दिल्लीमध्ये मागील एकाहत्तर दिवसांपासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (दि. ६ फेब्रुवारी) देशातील बहुतांशी राजकीय पक्षांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी ‘राष्ट्रीय चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे.
या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने शनिवारी (६ फेब्रुवारी) दुपारी १२ ते ३ यावेळेत पुणे नाशिक महामार्गावर मोशी चौकात आंदोलन करण्यात येणार आहे, असे पत्रक कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. ४ फेब्रुवारी) आकुर्डी येथिल श्रमशक्ती भवन येथे विविध राजकीय पक्ष व सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे पत्रक प्रसिध्दीस देण्यात आले आहे. या चक्का जाम आंदोलनास राष्ट्रवादीसह इतरही पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.