- गुन्हा दाखल त्या दोन ठेकेदारांकडून आमचीच फसवणूक झाल्याचा दावा..
- पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- महापालिकेच्या विविध विकास कामांतील निविदा प्रक्रियेतील बोगस एफडीआर प्रकरणात महापालिकेने १८ जणांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यातील दोघांनी त्यांचीच फसवणूक झाल्याची तक्रार पिंपरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल चंद्रकांत रासकर (वय ३६, रा. भोसरी) आणि आकाश रामेश्वर श्रीवास्तव (वय ५७, रा. अधेरी वेस्ट, मुंबई) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली आहे. निविदा प्रक्रीयेत खोटी एफडीआर, बँक गॅरंटी सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी महापालिकेने या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून निविदा भरण्यास प्रतिबंध घातला आहे.
अतुल रासकर यांच्या फिर्यादीनुसार, रासकर यांची अतुल आरएमसी या नावाने कंपनी आहे. आरोपीने कंपनीच्या नावाचा गैरवापर करून फिर्यादी रासकर यांच्या नावाच्या खोट्या सह्या करून १९ मार्च २०२० रोजी पालिकेच्या कामाचा आदेश मिळविला. तसेच ३ लाख ३० हजारांची खोटी एफडीआर सादर करून रासकर यांची फसवणूक केली आहे.
आकाश श्रीवास्तव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंढरीनाथ सुभाष म्हस्के (रा. धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. म्हस्के यांची निर्मिती इन्फ्रा या नावाची भागिदारीत संस्था आहे. श्रीवास्तव यांची म्हाळसा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी आहे. म्हस्के यांनी कंपनीत अजून दोन भागीदार असल्याची माहिती श्रीवास्तव यांना दिली. म्हस्के हे श्रीवास्तव यांच्या संपर्कात राहिले. कामाच्या निविदा प्रक्रियेत लघुत्तम निविदाधारक म्हणून श्रीवास्तव यांच्या कंपनीची निवड झाली. त्यावेळी म्हस्के यांनी उपकंत्राटाची कागदपत्रे आहे श्रीवास्तव यांच्या कंपनीच्या नावे महापालिकेत निविदा भरून च-होली येथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारीत समूहशिल्प परिसरात संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्याचे ६ कोटी ४५ लाखाचे काम मिळविले. या निविदेसाठी सुरक्षा अनामत म्हणून महापालिकेस महाराष्ट्र बँकेची ३३ लाख रुपये खोटी बँक गॅरंटी दिली. त्यावर ३ डिसेंबर २०२० रोजी महापालिकेची एक नोटीस श्रीवास्तव यांच्या ई – मेलवर आली. त्यामध्ये खोटी बँक गॅरंटी दिल्याबद्दल कारवाई का करू नये, याचा खुलासा मागितला. त्या नोटीसीवरही म्हस्के यानी श्रीवास्तव यांच्या कंपनीची परवानगी न घेता कंपनीचे बनावट लेटरहेड तयार करून कंपनीचे संचालक नागेशपांडे यांच्या खोट्या सह्याचा वापर करुन उत्तर दिले. यात कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे श्रीवास्तव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.