- दोन लाख किमतीचा साप जप्त
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी सांगली येथून वाकड परिसरात आलेल्या एका तरुणाला पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला आहे. श्रीधर संपतराव शिंदे (वय २१, रा. आंजणी ता, तासगाव, जि. सांगली) असे शेतात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सुनिल विठ्ठल भुजबळ (वय ४२) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद पोलिस दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कर्मचारी धनाजी शिंदे आणि गोविंद चव्हाण यांना माहिती मिळाली की, एक तरुण मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी डांगे चौकात येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. ७) दुपारी डांगे चौकात सापळा लावून त्याला ताब्यात घेऊन मांडूळ जातीचा साप जप्त केला. श्रीधर याला त्याच्या शेतात दोन दिवसांपूर्वी मांडूळ जातीचा साप आढळला असून त्याने तो विकण्यासाठी आणला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचा मांडूळ जातीचा साप जप्त केला आहे.