- महासभेच्या अधिकृत मान्यतेसाठी विषय रडारवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- बहुचर्चित यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची सफाई करण्याच्या विषयाला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये यांत्रिक पद्धतीने रस्त्यांची सफाई करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र निविदेमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने तसेच निविदा संशयास्पद वाटत असल्याने यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तसेच अनेक कामगारांचे काम जाणार असल्याने याला विरोध करण्यात आला होता.
आता पुन्हा शहरातील १८ मीटर पेक्षा जास्त रुंद असलेल्या रस्त्यांसाठी यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची सफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्युशन यांनी त्याचा आरएफपी मसुदा सादर केला आहे. त्यानुसार शहरातील १८ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची चार भागात विभागणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई करण्यासाठी २४ स्वीपींग मशीन, ८ हूक लोडर, ४ पाण्याच्या टँकर्सची आवश्यकता आहे. यासाठी ७ वर्ष कालावधीची निविदा राबविली जाणार आहे. यासाठी अंदाजे ४९४ कोटी रुपये खर्च होणार आहे. तत्पूर्वी महापालिका महासभेची मान्यता घेण्यात येणार आहे.


















