- कोविड केअर सेंटरच्या बिलासंदर्भात आयुक्तांची चुप्पी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर बिलासंदर्भात चौकशी समिती नियुक्त केली होती. २२ सेंटरने सादर केलेल्या सात कोटींची बिले देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थायी समितीवर आक्षेप आल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बिले देण्याची प्रक्रिया थांबविली आहे.
कोरोनाचा उद्रेक वाढत असताना पिंपरी – चिंचवड महापालिकेने कोविड सेंटर उभारली होती. २२ सेंटरने सादर केलेल्या ८७८ दिवसांची बिलांपोटी ६ कोटी ९१ लाख रुपये देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. त्यावेळी प्रक्रियेविषयी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी विरोध नोंदविला. तर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध केला नाही. आक्षेप आल्यानंतर स्थायी समितीने प्रशासकीय समिती नियुक्त केली होती. त्यांचा अहवाल आल्यानंतर रुग्ण नसलेल्या दिवसांचे जेवणाचे, औषधांचे बिल बजा करून राहणाऱ्या उर्वरित रकमेवर ६५ टक्के बिले देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार २२ सेंटरनी ६७८ दिवसांच्या बिलांपोटी त्यांना एकूण सात कोटी रुपये देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेने नुकतीच कोविड सेंटर बंद केली आहेत. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीतील बिले सादर केली असून, त्याला आक्षेप घेण्यात आला आहे. विशेषत: रुग्णसंख्या कमी झालेली असताना कोविड सेंटरचे बिल कसे वाढले असा आक्षेप घेण्यात आला आहे. ज्या खासगी रुग्णालयांनी कोविड सेंटर उभारले होते, त्यांनी वाढीव बिले सादर केल्याचा आक्षेप आहे.


















