- ५ टक्के अधिमूल्य रक्कम भरून मिळणार बांधकाम परवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीकाठच्या निळ्या रेषे (ब्ल्यू लाइन) लगतच्या झोनमधील (हरीत पट्टा) जागा रेसिडेन्शीयल झोनमध्ये (रहिवाशी वापर विभाग) समाविष्ट केल्या जाणार आहेत. जागेच्या किंमतीनुसार ५ टक्के अधिमूल्य रक्कम भरून बांधकाम करता येणार आहे. अधिमूल्य भरण्याची मुदत ८ मार्च २०२१ पर्यंत आहे.
शुल्क न भरणाऱ्या जागा मुदतीनंतर ग्रीन झोनमध्येच राहणार आहेत. शहरातील तीन नद्यांच्या कडेने नागरीवस्ती फोफावली आहे. नदीकाठच्या निळ्या ते लाल पूर रेषेच्या बाहेरील ना विकास वापर विभागात दर्शविलेली ग्रीन झोन क्षेत्राचा रहिवाशी क्षेत्रासाठी वापर होऊन सुनियोजित विकास होण्यासाठी तो भाग आर झोनमध्ये समाविष्ट करण्याची पालिकेची मागणी आहे.
तसा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेने राज्य शासनाकडे २० फेब्रुवारी २०१६ ला पाठविला. त्यास मंजुरी देत १७ सप्टेंबर २०१९ च्या आदेशानुसार राज्य शासनाने ५ टक्के अधिमूल्य रक्कम स्वीकारून आर झोनमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता दिली. त्यासाठी दुसऱ्यांदा मुदत दिली.
बाजारभावानुसार जागेच्या किंमतीवर ५ टक्के अधिमूल्य रक्कम भरल्यानंतर पालिकेकडून आर झोनचा दाखला देण्यात आला. मुदतीनंतर काही जागा मालकांनी ५ टक्के अधिमूल्य रक्कम भरले. त्यानुसार शासनाकडे दुसऱ्यांदा फेरप्रस्ताव पाठविण्यात आला. कोरोना संक्रमणामुळे शासनाकडून त्यास विलंबाने मान्यता मिळाली.
२० जानेवारीच्या आदेशानुसार शहरातील ग्रीन झोनमधील जागा आर झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी ८ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. मुदतीमध्ये ५ टक्के अधिमूल्य भरणाऱ्या जागा आर झोनमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यानुसार त्यांना बांधकाम परवाना दिला जाणार आहे.