- पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून कारवाईचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- प्रशिक्षण शिबिर टाळण्यासाठी तीन पोलिस कर्मचारी जाणीवपूर्वक रुग्णालयात दाखल झाले. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत त्या कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोमवारी (दि. ८) रात्री याबाबतचे आदेश दिले. श्रीकांत हरिशचंद्र शिंदे (वाकड), विजय वसंत गायकवाड (वाकड), जुम्मा सिकंदर पठाण (चिखली) असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची रामटेकडी येथे सुरु असलेल्या २२ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, तीनही कर्मचारी शिबिराला उपस्थित राहिले नाहीत. तसेच, वरिष्ठांना माहिती न देता ते परस्पर रुग्णालयात दाखल झाले. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता शिस्तभंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.