- नागरिकीकरण वाढल्याने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची स्थानिकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- पुनावळेत कचरा डेपो करण्यासंदर्भात मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून, याठिकाणी कचरा डेपो उभारण्याऐवजी नागरिकीकरण वाढल्याने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा, अशी मागणी केली आहे.
पुनावळे येथील सर्व्हे क्रमांक २३ मध्ये वनविभागाच्या क्षेत्रात कचरा डेपोचे आरक्षण आहे. २२ हेक्टरचे आरक्षण विकसित करण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाच्यावतीने बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील खाणीच्या जागेची मोजणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी आले होते.
याबाबत पुनावळे, रावेत, किवळे, ताथवडे भागातील शेतकरी मोजणीच्या ठिकाणी जमा झाले. यावेळी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, शिवसेना नगरसेवक रेखा दर्शिले, विक्रम वाघमारे, हुशार भुजबळ आदी उपस्थित होते. या भागातील विविध गृहनिर्माण सोसायट्यामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोजणी करू नये अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमा झाल्याने अधिका-यांनी मोजणी थांबविली. शेतक-यांनी अधिका-यांना निवेदन दिले. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी निघून गेले.
वाकड, ताथवडे, पुनावळे परिसराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या भागात कचरा डेपो उभारण्याऐवजी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्यातून या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
– राहुल कलाटे, शिवसेना गटनेते…
हा भाग नव्याने विकसित होत आहे. या भागात कचरा डेपो उभारणे चुकीचे आहे. या कचरा डेपोला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. एका भागात डेपो असताना नव्याने डपो उभारण्याची गरज नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे.
– मयूर कलाटे, नगरसेवक राष्ट्रवादी…


















