- पालिकेच्या मुख्य लिपिकाला अतिरिक्त आयुक्तांकडून नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- कोविड केअर सेंटरची बिले देण्यास विरोध करणारी टिप्पणी लिहिणाऱ्या मुख्य लिपिकाला महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी नोटीस दिली आहे. फाईलमधील टिप्पणी बाहेर पडलीच कशी, असा जाब विचारला, अशी चर्चा महापालिका वर्तुळात होती.
भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) च्या बिल दिल्याचे प्रकरण गाजत आहे. याबाबत विरोधी पक्षाने आरोप केला होता. तसेच स्पर्शने सादर केलेल्या बिलांसंदर्भात महत्त्वपूर्ण शेरा मुख्य लिपिकाने दिला होता. यावरून अतिरिक्त आयुक्त अजित पवार संतप्त झाले आहेत.
त्यांनी मंगळवारी रात्री लिपिकाला कार्यालयात बोलावून घेतले. याबाबत अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, नेहमीचा लिपिक रजेवर गेल्यानंतर तात्पुरत्या लिपिकाकडून दमदाटी करून नोट तयारी करून घेतली. डॉक्टर दोषी आहे, अशी दीड पानाची नोट तयार करून घेतली. लिपिकाने स्वाक्षरीला विरोध केला असतानाही त्याची स्वाक्षरी घेतली. मी रजेवर होतो. एका पत्रामुळे सीसीसी सेंटरबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत. कोण लिपिक आहे म्हणून मी त्याला नोटीस दिली आहे.


















