- चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री मंगलमूर्तीची माघी यात्रा यंदा रद्द केली आहे. मंगलमूर्तीच्या पालखीचे देवगाडीतून येत्या रविवारी मोरगावकडे प्रस्थान होणार आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महान गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांनी १५६१ मध्ये चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. त्यांना श्रीक्षेत्र मोरगाव येथे तपश्चर्येने श्री मंगलमूर्तीची मूर्ती प्राप्त झाली आहे. ती मूर्ती वर्षांतून दोन वेळा श्रीक्षेत्र मोरगावला पालखीतून नेण्याची प्रथा आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा साधेपणाने साजरी केली जाणार आहे. यात्रेचे चिंचवडहून रविवारी रोजी दुपारी दोन वाजता मोरगावकडे प्रस्थान होणार आहे. यावर्षी माघी यात्रेचा कालावधी सहा दिवसांचाच राहील.
मंदार महाराज देव यांनी सांगितले की, यात्रा रविवारी मोरगावला जाणार व १९ फेब्रुवारीला देवगाडीतून येणार आहे. यावर्षी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार पार पाडणे आवश्यक आहे.


















