- शहरातील परकीय नागरिकांची कुंडली मिळणार एका क्लिकवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- शहरात येणा-या परदेशी नागरिकांच्या नाव नोंदणीसाठी पोलीस आयुक्तालयाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेकडून परकीय नागरिक विभाग (एफआरओ) आठवडाभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे.
त्यामुळे शहरातील परकीय नागरिकांची त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण, कालावधी, कामाचे स्वरुप आदीबाबत शहर पोलिसांना माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पिंपरी – चिंचवड शहरात तळवडे सॉफ्टवेअर पार्क तसेच हिंजवडी – माण आयटी पार्क आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीचा (एमआयडीसी) मोठा परिसर असून, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या संख्येने आहेत. तसेच पर्यटन, शिक्षण व व्यवसायाच्या अद्ययावत सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे परदेशी नागरिकांचा शहरात राबता आहे.
या नागरिकांची शासकीय यंत्रणेकडे नोंद असते. मात्र स्थानिक पातळीवरदेखील या नागरिकांबाबत माहिती असावी, यासाठी पोलिसांच्या स्थानिक आस्थापनेकडून त्यांची नोंद केली जाते. पिंपरी – चिंचवड शहरातील परकीय नागरिकांची नोंदणी सध्या पुणे येथे होत आहे. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी चारित्र्य पडताळणीची सुविधा शहर पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा पुढचा टप्पा म्हणून परकीय नागरिकांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे.
त्यासाठी एक पोलीस निरीक्षक, दोन अधिकारी, आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुविधा ऑनलाईन असल्याने त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता केली आहे.


















