- पालिकेकडून होणार कार्यवाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- शहरातील अमानांकित आणि विनापरवाना गतिरोधक तात्काळ काढून टाकण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार गतिरोधक काढण्यासाठी सुरूवात करीत असल्याचे कार्यकारी अभियंता सुनील वाधुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक – अध्यक्ष नितीन यादव यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी महापालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. गतिरोधकांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी जाणून घेण्याबाबत माहिती अधिकारामध्ये महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली, याची माहिती मागितली होती.
या अर्जावर आठ क्षेत्रीय कार्यालयांकडून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे याविरूद्ध यादव यांनी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील वाधुंडे यांच्याकडे अपील केले होते. त्यांच्या अपीलाबाबत नुकतीच सुनावणी झाली. वाधुंडे यांनी यादव यांचे अपील मान्य केले. तसेच, किती गतिरोधक चुकीचे आहेत आणि किती प्रमाणित आहेत, याची माहिती पुढील पंधरा दिवसांत देण्यात यावी, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच, शहरातील अमानांकित आणि विनापरवाना गतिरोधक काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचे नमूद केले.


















