- कार्यालयातही ऱ्हाडा; सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२१) :- शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी कागदपत्र छाननीच्यावेळी उमेदवारांना रांगेत न घेता थेट प्रवेश न दिल्याने आरटीओतील उपनिरीक्षकास एकाने धक्काबुक्की केली. तसेच कार्यालयातील दरवाजे जोरजोरात वाजवून, आरडाओरडा केला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मोशी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे शनिवारी हा प्रकार घडला. प्रसाद प्रभाकर पवार (वय ३४, रा. चिखली, प्राधिकरण) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बबन दत्तात्रय मिसाळ (रा. मोरेवस्ती, चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी यांना व त्यांच्या ३ सहकाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. तर शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी सुरू असलेल्या कक्षाच दरवाजा जोरजोरात वाजवून तसेच आरडाओरडा करून शासकीय कामा अडथळा निर्माण केला. आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये विनापरवानगी कार्यालयातील फोटो काढले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे आरटीओचे उपनिरीक्षक आहेत. मोशी येथील आरटीओ कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्याचे ते काम करतात. कार्यालयात ते शनिवारी त्यांचे काम करीत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला फोन केला. शिकाऊ अनुज्ञप्ती घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना नियम न लावता कागदपत्र छाननीच्या वेळी रांगेमधून घेता थेट प्रवेश द्यावा, असे सांगून आरोपीने त्यांना धमकी दिली. त्यानंतर आरटीओ कार्यालयात येऊन आरोपीने फिर्यादीशी हुज्जत घातली. तसेच त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेत खुर्चीवरून ओढले.