- पोलिसांनी चोवीस तासांच्या आत केले आरोपींना जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२१) :- आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निघृणपणे खून केला. तळवडे – चाकण रस्त्यावर तळवडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी (दि. १२) ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनीट तीनच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
संकेत गायकवाड (रा. निघोजे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई कैलास उल्हारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन रवींद्र जगताप (वय २०. रा. निघोजे), विशाल अशोक चव्हाण (वय २१, रा. देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा महाराज (पूर्ण नाव, पत्ता नाही) साथीदाराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तळवडे – चाकण रस्त्याने देहरोड पोलीस गस्त घालत असताना तळवडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला असल्याचा प्रकार देहरोड पोलिसांच्या निदर्शनास आला. देहरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
येथे जाऊन त्याबाबत चौकशी केली असता मयत संकेत गायकवाड याचे त्याच्या नातेवाईकांसोबत जमिनीच्या कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाद असलेले संशयित आरोपी रोहन जगताप आणि विशाल चव्हाण यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला जगताप याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रडण्याचे आणि दुःख झाल्याचे नाटक केले. तसेच मयत संकेत हा आपला मावसभाऊ असल्याचेही सांगितले.
पोलीसी खाक्यासमोर त्याची ही बनावगिरी अधिक काळ टिकली नाही. रोहन याने त्याचा साथीदार विशाल आणि महाराज यांच्यासोबत मिळून हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. मयत संकेत याने रोहनच्या आईला पोटात लाथाबुक्क्या मारून शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद सुरु होते. त्याच्या रागातून संकेतचा खून करण्याचा कट रचला. आरोपी निगडी येथून शुक्रवारी निघोजे गावाकडे जात असताना तळवडे ब्रिजजवळ संकेत थांबल्याचे दिसले. आरोपींनी संकेतला गोड बोलून ब्रिजच्या खाली नेले. तिथे त्याच्यासोबत भांडण करून त्याला दगडाने मारहाण केली. त्याचा चेहरा ओळखता येऊ नये यासाठी आरोपींनी मोठमोठे दगड संकेतच्या चेहऱ्यावर मारून त्याचा चेहरा विदुप करून टाकला. चोवीस तासात पोलिसांनी मयताची ओळख पटवून आरोपींना अटक केली आहे.