न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खडकी (दि. १९ डिसें.) :- टायर सुस्थितीत असताना, तब्बल १८ पंक्चर झाल्याचे सांगून मोटार चालकाची फसवणूक करून १८०० रुपये उकळणाऱ्या टायर पंक्चर दुकान चालकासह त्याच्या एका साथीदारा विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत चंद्रकांत शिंदे (रा. बोपोडी) यांनी पंक्चर दुकान चालकाविरोधात खडकी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बंटी ऊर्फ आशुतोष रवींद्र येरेल्लू (वय ३५, रा. बोपोडी) व सुमित सुरेश पाल (वय २०, दापोडी) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत शिंदे हे त्यांच्या मोटारीतून (क्रमांक एम एच १४, बी एक्स २८७६) मुंबई-पुणे महामार्गाने शिवाजीनगरच्या दिशेने जात होते. खडकी रेल्वे स्थानकासमोरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवत मोटारीचा वेग कमी करण्यास भाग पाडले. मोटारीच्या जवळ जाऊन टायरमध्ये हवा कमी आहे, असे सांगून पंक्चर काढण्याचे दुकान जवळच आहे, टायर तपासून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मोटारचालक त्या दुकानाजवळ गेले.
टायर तपासताना दुकानदाराने शॅम्पू मिश्रितपाणी टायरवर ओतले. शॅम्पूच्या पाण्याचे विविध ठिकाणी हवेचे बुडबुडे येत असल्याचे दिसून आले. पंक्चर काढण्याच्या किटमधील टोकदार हत्यार टायरमध्ये विविध ठिकाणी खोचून त्याने एकाच टायरमधील तब्बल १८ पंक्चर काढले असल्याचे सांगितले. प्रत्येक पंक्चरसाठी १०० रुपयेप्रमाणे शिंदेंकडून १८०० रुपये उकळले. टायरला एवढे पंक्चर असताना, मोटार येथपर्यंत आली कशी? अशी शंका मोटारचालकाच्या मनात निर्माण झाली.
पंक्चर नसतानासुद्धा पंक्चर करून मोटारीच्या टायरचे नुकसान केल्याची बाब संकेत शिंदे यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. मोटारचालकांची दिशाभूल करून आर्थिक लूट करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. पुढील तपास खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे करीत आहेत.










