- पोलीस शिपाई, कनिष्ठ श्रेणी लिपिक, कार्यालयीन शिपाई पदावर नियुक्त्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आस्थापनेवरील २०१८ पूर्वी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण व इतर घटकातील दिवंगत अंमलदार विशेषतः कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराच्या वारसांची पोलीस दलात अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले होते.
अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीमध्ये प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून अनुकंपा तत्त्वावरील संबंधित उमेदवारांना पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले. सात उमेदवारांची पोलीस मुख्यालयात शारीरिक मोजमाप व कागदपत्रांची पडताळणी झाली. पात्र उमेदवारांची वैद्यकीय व चारित्र्य पडताळणी करण्यात आली.
पोलीस शिपाई, कनिष्ठ श्रेणी लिपिक, कार्यालयीन शिपाई पदावर नियुक्त करण्यात आले अशा दहा जणांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते आज (बुधवारी, दि. ३) नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुकंपा तत्वावर कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून दोन उमेदवारांना तर वर्ग चार कार्यालयीन शिपाई पदावर दोन महिला उमेदवारांना देखील नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निवड झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


















