- विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची उपरोधिक टीका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- सत्ताधारी भाजपने विलास मडिगेरी यांचा अपवाद वगळता निष्ठावंत नगरसेवकांना कायम डावलले आहे. त्यामुळे महापालिकेत भाजप पक्षच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी बुधवारी (दि. ३) केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने नगरसेवक रवी लांडगे यांना स्थायी समिती अध्यक्षपद नाकारण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या संदर्भात विचारले असता मिसाळ बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संधी न दिल्याने लांडगे यांनी राजीनामा दिला. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट कारणीभूत ठरत असेल तर, रवी लांडगे यांनी तत्काळ राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली असता. त्याचे स्वागत केले असते. ‘ सांगली पॅटर्न ‘ राबवून त्यांना आम्ही समितीचे अध्यक्ष केले असते, असा दावा त्यांनी केला.
भाजप महापालिकेत अस्तित्वास आहे का हा संशोधनाचा विषय आहे. शिवसेनेतून आलेल्या सीमा साळवेंना प्रथम स्थायी समिती अध्यक्षपद दिले. त्यानंतर राष्ट्रवादीतून आलेल्या ममता गायकवाड व संतोष लोंढे यांना अध्यक्ष केले गेले. विलास मडिगेरी हे एकमेव मूळ भाजपचे आहेत. त्यावरून स्थानिक नेतेमंडळी नेहमीच निष्ठावंत व मूळ भाजपवाल्यांना डावलतात हे स्पष्ट होते. कै. अंकुशराव लांडगे यांनी शहरात भाजप रूजविली. त्यांच्या परिवारातील रवी लांडगेबाबत आता असाच प्रकार घडला आहे, असा आरोप त्यांनी केला.












