- कायमस्वरूपी ऐवजी केवळ दोन महिन्यांच्या रोजगारावर बोळवण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- करोनासेवेत ठेकेदारांमार्फत मानधनावर वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांकडून कामावर घेण्यासाठी महापालिकेसमोर आंदोलन सुरू आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आंदोलकांनी केवळ दोन महिन्यांसाठी कामावर घेण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला असून आंदोलन कायम ठेवणार असल्याचे सांगितले.
करोना योद्ध्यांची त्यांना कायमस्वरुपी मानधनावर पालिका सेवेत घ्यावे. करोना काळात ज्या परिचारिका, डॉक्टर, वार्डबाय या कर्मचाऱ्यांनी कोणताही विचार न करता पूर्ण क्षमतेने करोना काळात काम केले. त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने कामावरून कमी केले आहे. याच पार्श्वभूमीवर करोना योध्दा बचाव कृती समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गरज सरो, वैद्य मरो हे बेमुदत आंदोलन सुरू केले. पालिकेसमोर १२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या आंदोलकांना पालिकेच्या सेवेत घेण्याची मागणी केली जात होती.
दरम्यान, आयुक्त पाटील यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याबाबत संबधितांना निर्देश दिले. त्यानुसार पालिकेकडून सुमारे ३५० लोकांना दोन महिन्यांसाठी कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे. प्रथम रुजू झालेल्या कर्मचाऱ्याप्रमाणे संबधित कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी कळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केवळ दोन महिन्यांसाठी कामावर घेण्याचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. आंदोलन सुरुच ठेवणार आहोत, असे आंदोलकांनी सांगितले.











