- पोटनिवडणुकीच्या तारखेबाबत अनभिज्ञता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- चिखली, आकुर्डी, दिघी प्रभागातील तीन नगरसेवकांचे कोरोना काळात निधन झाले होते. या प्रभागांतील पोटनिवडणु कीची तयारी सुरू झाली असून राज्य निवडणुक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ ची विधानसभा निवडणुकीची मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेला मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. पालिकेकडून प्रभानिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चार वर्षात प्रभाग क्रमांक एक चिखलीमध्ये दुप्पट मतदार वाढले, या मतदार संघात ६६ हजार १४२ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ४ दिघी बोपखेलमध्ये ४२ हजार ४३३ आणि प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, आकुर्डीत ५० हजार २८९ जण पोटनिवडणुकीसाठी मतदान करु शकणार आहेत.
कोरोना काळात नागरिकांची सेवा करताना चिखली प्रभाग क्रमांक एक ‘ ड’चे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, आकुर्डीतील प्रभाग चौदा ‘ अ’चे राष्टवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख, दिघी प्रभाग क्रमांक चार ‘ब’ मधील भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचा मृत्यू झाला होता. रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक घेण्यात यावी, यासंदर्भातील माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे माहिती पाठविली होती. त्यानुसार पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.
प्रभानिहाय अंतिम मतदार यादीत प्रभाग क्रमांक १ तळवडे गावठाण- चिखलीत महिला २९ हजार ५०४, पुरुष ३६ हजार ६३४ आणि इतर ४ असे एकूण ६६ हजार १४२ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ४ दिघी-बोपखेलमध्ये १९ हजार ५९९ महिला, २२ हजार ८३३ पुरुष आणि १ इतर असे एकूण ४२ हजार ४३३ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी-आकुर्डी गावठाणात २३ हजार ३०१ महिला, २६ हजार ९८७ पुरुष आणि इतर १ असे ५० हजार २८९ मतदार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी महापालिकांना निवडणुकीसंदर्भातील बिनविरोध प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत आणि महापालिका क्षेत्रातील तीन पोटनिवडणूक एप्रिल किंवा मे मध्ये महापालिकांच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे.
१२ मार्चला प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
प्रभागांतील नगरसेवकांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या प्रभागांतील निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.











