न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार (दि. २०) रोजी महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे.
दापोडीपासून पिंपरी पर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. हाच मेट्रो मार्ग पिंपरी महापालिका भवनापासून भक्ती-शक्ती निगडीपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावास आज सर्वसाधारण सभेत सभागृहाने मान्यता दिली आहे. संबंधित अहवाल राज्य सरकारकडे व राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार आहे.
यात सबंधित मेट्रो मार्ग उभारणीसाठी भूसंपादन करणे व मार्गाला अडथळा ठरणाऱ्या सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे एक हजार ४८ कोटी २२ लाख रुपये खर्चास या अगोदरच स्थायीने मान्यता दिली आहे. या मार्गाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी केली आहे.










