- आठवडाभरात ७९ परमिट रूम, बिअरबारवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून परमिट रूम व बिअर बार सुरू ठेवल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. आठवडाभरात ७९ कारवाया करण्यात आल्या. यात सुमारे दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन विभागाचे ‘इ व फ’ हे दोन विभागाचे कार्यालय पिंपरी- चिंचवड शहरात आहेत. या दोन्ही कार्यालयांकडून शहरात कारवाई सुरू आहे. महापालिका, पोलीस यांच्या संयुक्त पथकात या विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. या पथकाकडून परमिट रूम रेस्टॉरंट, बिअर बार, देशी दारूचे किरकोळ विक्रीचे दुकान यांच्यावर कारवाई होत आहे. रात्री अकरानंतरही दुकाने सुरू असल्यास कारवाई करण्यात येत आहे.
दोन हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला जातो. मद्यविक्री करणारे हॉटेल, रस्टॉरेट तसेच इतर दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन होत आहे. याला आळा बसावा म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार कारवाईसाठी संयुक्त तसेच स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे निरीक्षक राजाराम शेवाळे यांनी सांगितले.
















