- प्रलंबित वाहन परवान्याची संख्या होणार कमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- वाहन परवाना काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून वेळ लागत होता. ऑनलाइन प्रतीक्षा कालावधी कमी व्हावा, प्रलंबित वाहन परवान्याची संख्या कमी होण्याच्या उद्देशाने पक्क्या वाहन परवान्याच्या कोट्यात बदल करण्यात आला आहे. यासाठीच दुचाकी वाहनाच्या कोट्यात वाढ करण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे.
वाहन कोट्यातील बदल ३ मार्चपासून लागू झाला आहे. खासगी वाहन कोटा १३२ होता, तो आता १६८ करण्यात आला आहे. दुचाकी वाहनाचा कोटा १३२ वरून १५३ करण्यात आला आहे. विनागिअर दुचाकीचा कोटा ३६ होता, आता वाढवून ५१ करण्यात आला आहे. इतर शिकाऊ आणि वाहनाच्या कोट्यात सध्यातरी वेळ घ्यावा लागतो. कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वी वाहनांचा एकूण कोटा ३६९ होता, आता ४४१ करण्यात आला आहे.
दुचाकी वाहन परवाना मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिकाऊ आणि पक्क्या परवान्यासाठी वेळ घ्यावा लागतो. कोरोनामुळे वाहन परवान्याचे काम बंद होते. त्यानंतर परवाने सुरू झाल्यावर परवाना काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून वाहन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे विविध सण – उत्सवाच्या निमित्ताने वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे वाहन परवाना घेण्यासाठीही गर्दी होत आहे. त्यामुळे हा कोटा वाढविण्यात आला आहे. ऑनलाइन कालावधीची प्रतीक्षा वाढली आहे. कच्चा आणि पक्का परवाना मिळण्यासाठी नागरिकांना एक ते दीड महिना वेळ पाहावी लागत आहे. प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या उद्देशाने परिवहन कार्यालयाने मार्चमधील सर्व शिकाऊ आणि पक्क्या चाचणीचा कोटा उपलब्ध करून दिला आहे. यानुसार शिकाऊ चाचणीचा कोटा ५०० करण्यात आला आहे. तर पक्क्या परवान्याचा कोटा ३५० करण्यात आला आहे. चाचणीला येताना मास्क, सेनिटायझरचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
















