- उपमहापौर केशव घोळवे यांचा तडकाफडकी राजीनामा..
- उपमहापौर पदासाठी नगरसेवक वसंत बोराटे यांचे नाव चर्चेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी आज शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पदाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला. वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी तो मंजूर करत आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, उपमहापौरपदासाठी वसंत बोराटे यांचे नाव निश्चित असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
सत्ताधारी भाजपने १४ ऑक्टोबर २०२० रोजी तुषार हिंगे यांचा तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला होता. त्यांच्या जागी मोरवाडीचेच प्रतिनिधीत्व करणारे केशव घोळवे यांची ६ नोव्हेंबर २०२० रोजी उपमहापौरपदी निवड झाली होती. त्यांना केवळ पाच महिन्यांचा कार्यकाळ देण्याचे पक्षांतर्गत ठरले होते.
उद्या (शुक्रवारी) त्यांचे पाच महिने पूर्ण होतात. पक्षाने दिलेली मुदत संपल्याने घोळवे यांनी आज उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. पुढील सहा महिन्यात बोराटे यांना उपमहापौरपद देण्याचे ठरले होते. त्यामुळे उपमहापौरपदी बोराटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
















