- हप्त्यापोटी पालिका पाटबंधारे विभागला अदा करणार १७७ कोटी ७८ लाख…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- पिंपरी – चिंचवडकरांची भागविण्यासाठी भामा – आसखेड घरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षित करण्यात आला आहे. हे पाणी आणण्यासाठी महापालिकेने काम सुरू केले आहे. या पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी २०८ कोटी ६५ लाख रुपये महापालिकेला पाटबंधारे विभागाला द्यावे लागणार आहेत.
पहिला ३५ कोटी ५५ लाख ६० हजारांचा पहिला हप्ता अदा करण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत शहराच्या लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून सरकारला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
शहराच्या चिखली, च-होली, वङ्मुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात पाणीपुरवठ्यासाठी या पाण्याची शहराला गरज आहे. त्यापैकी भामा आसखेड धरणातून पाणी तातडीने आणण्यासाठी कामेही सुरू झाली आहेत. त्यानुसार सरकारले भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास १३ नोव्हेंबर २०१८ रोजी मान्यता दिलेली आहे. पुणे पाटबंधारे खात्याने सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी २०८ कोटी ६५ लाख रुपये भरण्यास सांगितले होते. त्यापैकी पुनर्वसन खर्चापोटी ३० कोटी ८७ लाखांचा खर्च पालिकेने अदा केला आहे. तो खर्च वगळून १७७ कोटी ७८ लाख रुपये पालिकेला द्यावे लागणार असून, ही रकम पाच हप्त्यात भरावी लागणार आहे.
त्यापैकी पहिला हप्ता ३५ कोटी ५५ लाख ६० हजारांचा हप्ता पालिकेकडून चासकमान पाटबंधारे विभागाला अदा करण्यात येणार आहे. हा हप्ता मिळाल्याने पाणी आरक्षण निश्चित होणार आहे. पालिकेने जलवाहिनी टाकण्याचे व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हे पाणी शहरवासीयांना पुरविता येणार आहे. पाणीटंचाई संपविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
















