- मराठी लोकसाहित्य मनाला झंकारणारे आहे.प्रा.विजय लोंढे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- चिंचवडमधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन पद्धतीने ‘मराठी भाषा गौरव दिन ‘ विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.विजय लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्त्व सांगत मराठी लोकसाहित्यातील लोकगीते याविषयी माहिती दिली. लोकगीते कशी निर्माण झाली. अगदी साध्या सोप्या बोली भाषेतून मानवी जीवनाचे अनुभव, भाव भावना या काव्यांतून व्यक्त होतात असे सांगत ती कशा पद्धतीने गायली जात हे प्रत्यक्ष सादरीकरणातून गाऊन दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांना याचा छान आनंद घेता आला.
संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी आपले मनोगत मांडताना आपल्या मराठी भाषेचे शिक्षण बाहेरच्या देशातही दिले जाते त्यामुळे आपल्याच देशात मराठी भाषेचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे असे मत मांडले.
पिंपरी चिंचवडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र लाखे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी शब्दांचे उच्चारण व्याकरणीक दृष्टया योग्य व्हावे. तसेच मराठी एकच शब्द अनेक अर्थानी वापरता येतो हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे असे सांगत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, त्यासाठी जास्तीत जास्त वापर व्हावा असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. कला शाखा विभाग प्रमुख डॉ रूपा शहा व सहकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ दीपकजी शहा, प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, सी.ए.ओ.डॉ राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी तर, सूत्रसंचालन प्रा.देवांगी कुलकर्णी यांनी केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. सुरेखा कुंभार यांनी आभार मानले.