- गॅस पुरवठा न झाल्याने दहा जणांचा गेला जीव..
- महापौरांनी दिले चौकशीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२१) :- कोरोना काळातील ऑक्सिजन पुरवठा आणि कोविड सेंटरच्या बिलांवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे चित्र दिसून आले. महापालिकेतील अधिकाऱ्यावर आरोप करीत राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांनी एकमेकांची उणीदुणी काढली. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गॅब कंपनीला काळ्या यादीत टाकावे, कोविड काळातील वाढीव बिलांची चौकशी करावी, जोपर्यंत चौकशी चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे यांचे अधिकार काढून घ्यावेत, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनास दिले आहेत.
सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. फेब्रुवारी महिन्यातील तहकूब सभा सुरु झाली. त्यावेळी सुरुवातीला वायसीएम रुग्णालयातील गॅस विषयक प्रश्नोत्तरे घेण्यात आली. त्यात तुषार कामठे यांनी पाच प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे प्रशासनाने सविस्तर दिली नसल्याचा आरोप केला. तसेच चौदा वर्षापासून गॅस पुरविणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेची लूट चालविली असून, गॅस पुरवठा न झाल्याने दहा जणांचा जीव गेला, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. ठेकेदार जगविण्यासाठी सुरू असणाऱ्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी केली.
त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत भापजतील काही सदस्यांनी कोविड सेंटरच्या कामावरुन पक्षातील सदस्यांची नावे न घेता जोरदार टीका करुन घरचा आहेर दिला. माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, योगेश बहल, मंगला कदम, सीमा सावळे, नामदेव ढाके, एकनाथ पवार, राहुल कलाटे, तुषार हिंगे, आशा शेंडगे, मीनल यादव, सचिन भोसले, अंबरनाथ कांबळे, अजित गव्हाणे, संदीप वाघेरे, अभिषेक बारणे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
महापालिका सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने वायसीएममधील विरोधकांच्या ठेकेदारीवरुन हल्लाबोल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी कोविड काळातील कोविड सेंटरवरुन भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी कोरमचा मुद्दा उपस्थित केला. सभा कामकाज चालविण्यासाठीचे सदस्य सभागृहात नाहीत. त्यामुळे सभा तहकूब करावी, अशी सूचना मांडली. त्याला भाजपच्या मोरेश्वर शेंडगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर ढोरे यांनी सभा १८ मार्च दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब केली.
















