- प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पासाठी सात हजार ऑनलाइन नावनोंदणी तर, साडेतीन हजार अर्ज सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी दोन आठवड्यात सात हजार जणांनी ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी केली आहे. तसेच साडेतीन हजार अर्ज सादर केले आहेत.
प्राधिकरणाकडून सेक्टर १२ मध्ये जाधववाडी येथे स्पाईन रस्त्यालगत गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यात अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) एक हजार ५६६ तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) तीन हजार ३१७ अशा एकूण चार हजार ८८३ सदनिका आहेत.
” एलआयजी’च्या सदनिकांचेचटई क्षेत्र ५९.२७ चौरस मीटर असून, सदनिकेची विक्री किंमत ३२ लाख रुपये आहे. तसेच ‘ ईडब्ल्यूएस ‘ च्या सदनिकांचे चटई क्षेत्र २९.५५ चौरस मीटर असून सदनिकेची विक्री किंमत सात लाख ४० हजार रुपये आहे. यातून आवास योजनेंतर्गत असलेला शासनाचा अडीच लाख रुपयांचा हिस्सा वगळला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या योजनेंतर्गत नागरिकांकडून अर्ज सादर केले जात आहेत.
गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. ३० मार्च २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्राधिकरणाने शहरातील काही व बँकांमध्ये हेल्प डेस्क उपलब्ध करून दिले असून, तेथे नागरिकांना अर्ज भरण्यास मदत उपलब्ध होणार आहे. पहिल्या दोन आठवड्यांत सात हजारांवर कुटुंबांनी नावनोंदणी केली आहे. तसेच साडेतीन हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. एलआयजीसाठीचा किती आणि ईडब्ल्यूएस’साठी किती अर्ज अर्ज सादर झाले याबाबत ५ एप्रिल रोजी माहिती उपलब्ध होऊ शकते.
















